पोलिसांकडून रामराजे निंबाळकर यांची साडेतीन तास चौकशी   

मंत्री जयकुमार गोरे बदनामी प्रकरण

सातारा : मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामी आणि खंडणी प्रकरणात विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर यांची पोलिसांनी तब्बल साडेतीन तास चौकशी केली. पोलिसांनी फलटणमधील रामराजे निंबाळकर यांच्या निवासस्थानी त्यांची चौकशी झाली. जयकुमार गोरे प्रकरण रामराजे निंबाळकर यांना भोवणार का, हे आगामी काळात स्पष्ट होईल.
 
मंत्री जयकुमार गोरेंना खंडणी मागणारी महिला आणि आमदार रामराजे नाईक निबाळकर यांच्यातील संभाषणाची ऑडिओ क्लीप काही दिवसांपूर्वी व्हायरल झाली. मंत्री जयकुमार गोरेंनी त्रास देऊन आपली आर्थिक कोंडी केल्याचा आरोप संबंधित महिला सांगत असल्याचे आणि रामराजे निंबाळकर तिला नोकरीसाठी मदत करणार असल्याचे संभाषण त्या क्लीपमध्ये होते.
 
 रामराजे निंबाळकर हे त्या महिलेला पैसे पाठवण्यासंदर्भात चर्चा करताना दिसत आहेत. त्यामुळं ऑडिओ क्लीपमधील आवाज रामराजेंचा आहे का? याचा पोलिसांनी तपास करावा, रामराजे आणि त्या महिलेच्या आवाजाचे नमुने घेऊन पोलिसांनी सत्य समोर आणावे, अशी मागणी मंत्री जयकुमार गोरे यांनी केली. त्यानंतर वडूज पोलिसांनी आमदार रामराजे निंबाळकर, माजी आमदार प्रभाकर घार्गेंसह ११ जणांना चौकशीला बोलावले होते.
 
आपली तब्येत बरी नसल्याने चौकशीला येऊ शकत नाही, असे रामराजे निंबाळकर यांनी वकिलामार्फत वडूज पोलिसांना कळवले होते. रामराजे निंबाळकर मुंबईत उपचार घेत होते. त्यामुळे मुंबईत येऊन चौकशी करण्यात यावी, अथवा त्यांना सात दिवसांचा वेळ द्यावा, असंही रामराजेंच्या वकिलांनी वडूज पोलिसांना सांगितले. त्यामुळे मधल्या काळात चौकशी होऊ शकली नव्हती. वडूज पोलीस शुक्रवारी सकाळी फलटणमधील रामराजे निंबाळकरांच्या निवासस्थानी दाखल झाले. त्याठिकाणी पोलिसांनी रामराजेंची तब्बल साडेतीन तास चौकशी केली आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मंत्री गोरे यांच्या बदनामी आणि खंडणी प्रकरण रामराजेंना भोवणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Related Articles